राष्ट्रभाषा मराठी दिवाळी अंक २०२३ हाती देतांना अत्यंत आनंद होत आहे. हा साहित्याचा फराळ आपल्याला आवडेल याची मला मनापासून खात्री आहे. हा अंक तयार होण्यामागे अनेकांचे योगदान आहे. अतिशय कमी वेळ असूनही त्यांनी उत्तम साहित्याचा एक एक रत्न दिला. कथा, कविता, लेख, चारोळी तसेच यात व्यंगचित्रे देखील आहेत.
कोणत्याही भाषेत साहित्याचे अनन्यसाधारण महत्व असते. भाषेचा वापर जसे भाषा जिवंत असल्याचा पुरावा आहे. त्याचप्रमाणे त्यात वेगवेगळ्या माध्यमातून नवनवीन साहित्य निर्मिती होते हेही तिचे निकोप असल्याचे लक्षण आहे. याआधी मी नोंदी, गुगल, वर्डप्रेस तसेच विकिपीडियासारख्या आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर भाषांतरे केली. समाज माध्यमांवर मराठीच्या प्रचार व प्रसारासाठी खारीचा वाटा उचलला. तसेच तक्रारी व मागण्यांच्या माध्यमातून मराठीचा हक्क पुन्हा देण्याचा प्रयत्न करीत असतो. दिवाळी अंक बनवण्याचा हा पहिलाच प्रयत्न आहे.
हा साहित्यिक मेवा आपल्याला कसा वाटतो हेही आपण संकेतस्थळ व समाज माध्यमांद्वारे कळवावे ही विनंती. सूचना, त्रुटी, सुधारणा यांचे स्वागत. आपण झालेल्या त्रुटी पोटात घ्याल व सुधारण्याची संधी द्याल ही वाचक रुपी देवाला विनंती. हा ठेवा आपण अन्य मराठी भाषिकांना देखील सामायिक कराल ही अपेक्षा. सर्व लेखक, कवी आणि अन्य साहित्यिकांचे मनापासून आभार. दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल मनापासून आभार.
आपले प्रेम व लोभ असाच राहू द्यावा. व आपल्या भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा! जय मराठी, जय महाराष्ट्र!!
संपादक, प्रकाशक – हेमंत आठल्ये